Friday, February 7, 2020

कविता, ।। मामाची पोरगी।।

।।कविता।। 
।। मामाची पोरगी।। 
मामा तुमची पोरगी
आहे लई हुशार
तिला पाहून मी
झालो बघा बेजार  ।। १।। 

मामा तुमच्या पोरीला
विचारा नं जरा
कर म्हणावं माझा
विचार तु  गं जरा   ।। २।। 

येऊ लागलेत स्थळं
मामा यंदा माझ्यासाठी
करा नं विचार थोडा
जरा आमच्या लग्नासाठी  ।। ३।। 

मामा तुमची पोरगी
आहे थोडीशी सावळी
कधी तक्रार करणार नाही
असुनसुद्धा जरा बावळी   ।। ४।। 

मामा तुमचा आता
वाढवू नका तोरा
तुमचा भाचा तुंम्हाला
ठेवायचा का हो कोरा  ।। ५।। 

मामा आता तुम्ही
जरा विचार करा
तिच्यापेक्षा मी थोडा
आहे ना हो गोरा  ।। ६।। 

मामा तुमच्या पोरीचा
हात द्या माझ्या हाती
मागच्या सारखीच पुढे सुद्धा
अशीच जपूयात नाती   ।। ७।। 

मामा तुमच्या पोरीने
दिला नकार मला
तर खरं सांगतो.. ! (आई शप्पथ!!
पळवून नेईल तिला  ।। ८।। 

मामा तुमच्या पोरीला
समजवा  बघा जरा
मी आहे थोडा आवारा
पण्, संसार करील बरा.! । । ९।। 

संगीता भांडवले 
वाशी, उस्मानाबाद
myshikshankatta.blogspot.in

Tuesday, February 4, 2020

।। कविता।। ।। लेक लाडकी या घरची।।

।। लेक लाडकी या घरची।। 
हिरवा चुडा सौभाग्याचा
शोभे गव्हाळ रंगाला
लेक माझ्या सानुलीच्या
हळद लागली अंगाला   ।। १।। 

मळवट शोभतो  भाळी
मोती अन् लाल कुंकवाचा
कन्यादान करुन जाईल 
तुकडा माझ्या काळजाचा   ।। २।। 

सजलेल्या नवरीला
व-हाडी  पाहू लागली
कळलेच नाही  कधी
बाळ मोठी केंव्हा झाली  ।। ३।। 

लेकीमुळेच अंगण माझे
सदोदित हसरे दिसायचे
मुलगी परक्याचे धन म्हणत
आता सारे विसरायचे   ।। ४।। 

लेकीमुळे मायबापाचं
काळीज थोडं थोडं तुटतं
लेक लाडकी या घरची म्हणत
मनाला समजायचं असतंं   ।। ५।। 

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद