।।माझी बहिण।।
बहिण माझी लहान
गोष्टी करते मोठ्या
म्हणे बालपणी मी
होते सर्वांची लाडकी ।। १।।
सर्वच करायचे लाड
तशी ती लाडावली
अभ्यासात मात्र
फार नाही रमली ।। २।।
कला गुण तिच्यात
भरले होते ठासून
रांगोळी, मेहंदीत तर
फारच होती निपुण ।। ३।।
लहान तोंडी मोठा घास
फाडफाड बोलायची
राग शांत होताच
क्षणात मला बिलगायची ।। ४।।
बहिण माझी गुणी
नेहमी होती हसतमुख
संसारात ही रमली छान
तिला गृहलक्ष्मीचा मान ।। ५।।
असली कितीही नाती
तरी बहिणीची सर नाही
तिचे हट्ट पुरवायला
अजुन कुणी दमत नाही ।। ६।।
माहेरची लहान धाकटी
सासरला झाली थोरली
संसाररुपी सागरात
नाव तिची तरली ।। ७।।
संसारातील जबाबदा-या
पार पाडते दक्षतेने
सुख आणि दु:खात
साथ देते बरोबरीने ।। ८।।
माया, ममता, वात्सल्याचे
आहे मूर्तीमंत उदाहरण
रुप आणि सौंदर्याची
आहे ती लावण्यवती ।। ९।।
दिवाळी, राखी पुनवेला
औक्षण करते भावाला
पंचप्राणाने ओवाळले म्हणून
ओवाळणी मागते वहिणीला ।। १०।।
पुढील पिढीची
सतावते चिंता
भावाला भाऊ नाही
बहिणीला बहिण नाही ।। ११।।
*हम दो हमारा एक* चा
मंत्र जपतो आम्ही
बहिण भावाच्या नात्याला
कवितेतूनच वाचणार का तुम्ही? ।। १२।।
*संगीता भांडवले*
वाशी उस्मानाबाद