Saturday, July 27, 2024

माझी शाळा जिल्हा परिषद शाळा.. शिस्तप्रिय व आनंदी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा कवडेवाडी वरची

माझी शाळा जिल्हा परिषद शाळा 
*शिस्तप्रिय व आनंदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडेवाडी (वरची)तालुका वाशी जिल्हा धाराशिव 
   धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडेवाडी वरची येथील इयत्ता पहिली ते पाचवीचे  २४ विद्यार्थी मराठी माध्यमातून अतिशय आनंददायी शिस्तप्रिय भयमुक्त वातावरणात गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेत आहेत .शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भांडवले संगीता या आपली जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक व नियोजन पद्धतीचे पार पाडतात. फक्त शैक्षणिक कामकाजाचे नव्हे तर अभ्यासेतर  विविध उपक्रम राबवितात.दिनविशेषाचे औचित्य साधून वर्षभर त्यांचे कार्यक्रम सुरू असतात .या सर्व कार्यक्रमांचे, उपक्रमांचे नियोजन वर्षाच्या सुरुवातीलाच त्या  तयार करून ठेवतात .प्रत्येक शैक्षणिक सत्रात नवीन काहीतरी करण्याचा त्यांचा अधिक कल असतो. शाळा सुरू झाल्यापासून त्यांनी शाळा प्रवेशोत्सव, शिक्षण हक्क जनप्रबोधन ,माता पालकांच्या सभा  व त्यांच्याच सहकार्याने मेहंदी रेखाटन, वटपौर्णिमेला वृक्षारोपण, जलसाक्षरता ,वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ,स्वच्छ शालेय गणवेश, सुंदर दात स्पर्धा, शालेय मंत्रिमंडळ स्थापना ,भेटकार्ड सजावट स्पर्धा , शिक्षण सप्ताह इत्यादी उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमात शिक्षक व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. अनौपचारिक पद्धतीने हसत खेळत शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होताना दिसते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यामुळे शालेय वातावरणात विद्यार्थी रममाण होतात याचाच परिणाम शाळेतील उपस्थिती 98 ते शंभर टक्के असते. शालेय परिसर विस्तीर्ण असून शाळेच्या आवारात गुलमोहर ,निलगिरी व करंजीचे झाडे आहेत ,विद्यार्थी या झाडाच्या सावलीत मधल्या सुट्टीत खिचडी खातात व आनंदाने खेळतात बागडतात .शाळेत विविध स्पर्धा परीक्षा साठी विद्यार्थी बसवले जातात .इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती/ नवोदय, इयत्ता दुसरी इयत्ता तिसरी एमटीएस इत्यादी स्पर्धा परीक्षा. याचे श्रेय शाळेत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा मार्गदर्शन वर्गाकडे जाते. शाळेत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. वर्गात बसायला बेंच ,डेस्क आहेत. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालय, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वतंत्र किचन सेड ,विद्यार्थ्यांना जेवायला बसायला भोजन पट्ट्या, शालेय पोषण आहारासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना ताट इत्यादी साहित्य शाळेत उपलब्ध आहे .वेळोवेळी याचा वापर केला जातो. शाळेतील अतिशय उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थ्यांसाठी बक्षीस योजना .परिसरात सापडलेली वस्तू विद्यार्थी मुख्याध्यापकाकडे जमा करतात. मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे परिपाठात कौतुक करून बक्षीस देतात .या बक्षिसाचा भार स्वतः मुख्याध्यापक व शिक्षक उचलतात. विद्यार्थ्यांची व शिक्षकाची एकही वस्तू शाळेतून चोरीला जात नाही .शंभर टक्के उपस्थिती व स्वच्छ गणवेशाबद्दल विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहित केले जाते. तसेच परिपाठात हजेरी घेऊन त्या वर्गासमोर उपस्थितीत ध्वज लावला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची व गणेश स्वच्छ ठेवण्याची धडपड सुरू असते. शालेय गणवेश मध्ये तीन गणवेशांचा समावेश सप्ताहामध्ये केला जातो .यामध्ये दोन दिवस शाळेचा खाकी व पांढरा ड्रेस, दोन दिवस शाळेसाठी असणारा स्काऊट गाईडचा ड्रेस ,आणि दोन दिवस स्पोर्ट ड्रेस अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे नियोजन आहे. दैनंदिन परिपाठामध्ये प्रश्नमंजुषा व जो दिनांक तो पाढा ,इंग्रजी शब्दार्थ इत्यादी उपक्रम राबवले जातात. तसेच प्रसंगी दिनविशेष व जयंती , पुण्यतिथी उत्साही वातावरणामध्ये साजरे केले जातात.सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन पद्धतीचा वापर शिक्षक काटेकोरपणे करतात. त्याविषयीच्या नोंदी सुस्पष्ट व काळजीपूर्वक घेऊन त्याचे अभिलेखे अद्यावत ठेवतात. विद्यार्थ्यांनी सण २०२३२४ मध्ये केलेल्या निवडक विशेष कृती ,रंगकाम ,कोलाज शब्दसंग्रह ,सर्जनशील लेखन जमा केलेले साहित्य, ऐतिहासिक व भौगोलिक कात्रणे, माहिती चित्रे फोटो यांचा समावेश विद्यार्थी  संचयिकेत झालेला आहे. वर्षअखेरीस त्या संचयिकाचे प्रदर्शन पालक  व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत भरविले गेले .याद्वारे विद्यार्थ्यांच्या सवयी, अडचणी, छंद ,कल, शैक्षणिक प्रगतीचा पुरावा पालकांना मिळतो. विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींना प्रोत्साहन मिळते. शाळेला पुढील शैक्षणिक सत्राच्या नियोजनात अनेक उपक्रम प्रस्तावित आहेत.अशी ही शैक्षणिक गुणवत्ता वाढवत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारी शाळा सर्व मुलांना खूप आवडते. शिक्षिका शाळेमध्ये प्रवेश करताच विद्यार्थी त्यांचे हसून व गुलाबापुष्प देऊन  स्वागत करतात .तसेच वर्गात आल्यानंतर गुरुवंदना करत गुरूंचा आशीर्वाद घेतात.ही शाळा दोन शिक्षकी असून हे शिक्षक अध्यापनात नवनवीन प्रयोग करून अध्यापन  प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री सोमनाथ घोलप साहेब, विस्तार अधिकारी श्रीमती टेकाळे मॅडम, केंद्रप्रमुख श्री कैलास चौधरी सर ,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भांडवले संगीता  व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष कवडे व शाळेतील सहशिक्षिका यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाळा सतत प्रयत्नशील आहे.
     शब्दांकन 
श्रीमती भांडवले संगीता उत्तम 
    मुख्याध्यापिका 
 जि.प. प्राथमिक शाळा कवडेवाडी व.
ता वाशी जि.धाराशिव
9923445306

Saturday, July 20, 2024

Guru Purnima/ गुरुपौर्णिमा

गुरु शिष्य परंपरा हे आपल्या भारत देशाचं एक वैशिष्ट्य आहे .गुरुला साक्षात देव मानणारी आपली संस्कृती आहे. म्हणूनच....
 गुरुर ब्रह्ममा| गुरुर र्विष्णु |
गुरुर्देवो महेश्वरा |
गुरु साक्षात परब्रम्ह |
तस्मै श्री गुरवे नमः |
अशी आपण गुरूंची ओळख करून देतो .आपल्याला देव दाखवता येत नाही पण गुरूंच्या माध्यमातून आपण देवालाच अनुभवत असतो. गुरूंची लीला शब्दात मांडणे अशक्यच आहे म्हणून तर आपण दरवर्षी गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करत असतो .आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपोर्णिमा साजरी करतात .या दिवशी गुरुतत्त्व 1001 पटीने कार्यरत असते त्यासाठी शिष्य या दिवशी अखंड आपल्या गुरु सेवेत मग्न असतो. गुरु शिष्य हे नातेच असे आहे या नात्याला मर्यादा नाही. गुरूंची लीला शब्दात मांडणे अशक्यच आहे.
      गुरु हा संत कुळीचा राजा |
 गुरु हा प्राण विसावा माझा |
गुरुविण देवपूजा पाहत नाही 
त्रिलोकी|
     वरील काव्यपंक्तीतून गुरु शब्दाची महती येते .प्रथम आपण गुरु या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. ' गु 'म्हणजे अंधकार आणि ' रू ' म्हणजे नाहीसे करणारा .गुरु आपल्याला जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे हे शिकवतात आणि ज्ञानरूपी प्रकाशाच्या योग्य वाटेवर चालण्यास प्रवृत्त करतात. सांगितलेली साधना सतत करणे हीच गुरु विषयी खरी कृतज्ञता होय. गुरु आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतात माणसाच्या जीवनातील पहिले गुरू म्हणजे त्याचे आई-वडील. आई ही तर आपल्या जीवनातील पहिले आद्य गुरु. आई इतके श्रेष्ठ दैवत या जगात नाही असं समर्थांनी लिहिलं आहे. मूल जेव्हा लहान असते तेव्हा आई-वडीलच त्याच्यावर संस्कार करीत असतात .छोट्या- छोट्या गोष्टीतून जीवनात कसे वागायचे ते शिकवत असतात. आई-वडिलांनंतर नंबर लागतो तो शिक्षकांचा. त्यांचीही आपल्या जीवनात खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचे ,बालमनाला पैलू पाडण्याचे काम शिक्षक करीत असतात. मुलांच्या जीवनाला खरा आकार शिक्षकच देत असतात. आई-वडील आणि शिक्षकांनी कोऱ्या पाटीवर केलेले संस्कार कायमस्वरूपी टिकून राहतात मग ते चांगले असो किंवा वाइट. आई-वडील आणि शिक्षकच नाही तर जन्मापासून आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून आपण काही ना काही तरी शिकत असतो. ती प्रत्येक शिकवण देणारी गोष्ट आपली गुरुच असते. निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपणास काही ना काहीतरी शिकवत असते. या सर्वांना आपण गुरुस्थानी मानून त्याबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे  त्यांची त्यागाची, देण्याची, परोपकाराची वृत्ती आपण जोपासली पाहिजे. या सर्वांसाठी आपणास गुरूंची आवश्यकता असते. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे परंतु घटाने किंवा घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे.' गुरुबिन ज्ञान कहासे लावू?' हेच खरे आहे.

श्रीमती .
संगीता उत्तम भांडवले 
   मुख्याध्यापिका 
 जि प प्रा शा कवडेवाडी  
      ता.वाशी,जि.धाराशिव
९९२३४४५३०६
iamsangitabhandwale@gmail.com