गुरु शिष्य परंपरा हे आपल्या भारत देशाचं एक वैशिष्ट्य आहे .गुरुला साक्षात देव मानणारी आपली संस्कृती आहे. म्हणूनच....
गुरुर ब्रह्ममा| गुरुर र्विष्णु |
गुरुर्देवो महेश्वरा |
गुरु साक्षात परब्रम्ह |
तस्मै श्री गुरवे नमः |
अशी आपण गुरूंची ओळख करून देतो .आपल्याला देव दाखवता येत नाही पण गुरूंच्या माध्यमातून आपण देवालाच अनुभवत असतो. गुरूंची लीला शब्दात मांडणे अशक्यच आहे म्हणून तर आपण दरवर्षी गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करत असतो .आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपोर्णिमा साजरी करतात .या दिवशी गुरुतत्त्व 1001 पटीने कार्यरत असते त्यासाठी शिष्य या दिवशी अखंड आपल्या गुरु सेवेत मग्न असतो. गुरु शिष्य हे नातेच असे आहे या नात्याला मर्यादा नाही. गुरूंची लीला शब्दात मांडणे अशक्यच आहे.
गुरु हा संत कुळीचा राजा |
गुरु हा प्राण विसावा माझा |
गुरुविण देवपूजा पाहत नाही
त्रिलोकी|
वरील काव्यपंक्तीतून गुरु शब्दाची महती येते .प्रथम आपण गुरु या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. ' गु 'म्हणजे अंधकार आणि ' रू ' म्हणजे नाहीसे करणारा .गुरु आपल्याला जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे हे शिकवतात आणि ज्ञानरूपी प्रकाशाच्या योग्य वाटेवर चालण्यास प्रवृत्त करतात. सांगितलेली साधना सतत करणे हीच गुरु विषयी खरी कृतज्ञता होय. गुरु आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतात माणसाच्या जीवनातील पहिले गुरू म्हणजे त्याचे आई-वडील. आई ही तर आपल्या जीवनातील पहिले आद्य गुरु. आई इतके श्रेष्ठ दैवत या जगात नाही असं समर्थांनी लिहिलं आहे. मूल जेव्हा लहान असते तेव्हा आई-वडीलच त्याच्यावर संस्कार करीत असतात .छोट्या- छोट्या गोष्टीतून जीवनात कसे वागायचे ते शिकवत असतात. आई-वडिलांनंतर नंबर लागतो तो शिक्षकांचा. त्यांचीही आपल्या जीवनात खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचे ,बालमनाला पैलू पाडण्याचे काम शिक्षक करीत असतात. मुलांच्या जीवनाला खरा आकार शिक्षकच देत असतात. आई-वडील आणि शिक्षकांनी कोऱ्या पाटीवर केलेले संस्कार कायमस्वरूपी टिकून राहतात मग ते चांगले असो किंवा वाइट. आई-वडील आणि शिक्षकच नाही तर जन्मापासून आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून आपण काही ना काही तरी शिकत असतो. ती प्रत्येक शिकवण देणारी गोष्ट आपली गुरुच असते. निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपणास काही ना काहीतरी शिकवत असते. या सर्वांना आपण गुरुस्थानी मानून त्याबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे त्यांची त्यागाची, देण्याची, परोपकाराची वृत्ती आपण जोपासली पाहिजे. या सर्वांसाठी आपणास गुरूंची आवश्यकता असते. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे परंतु घटाने किंवा घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे.' गुरुबिन ज्ञान कहासे लावू?' हेच खरे आहे.
श्रीमती .
संगीता उत्तम भांडवले
मुख्याध्यापिका
जि प प्रा शा कवडेवाडी
ता.वाशी,जि.धाराशिव
९९२३४४५३०६
iamsangitabhandwale@gmail.com
No comments:
Post a Comment