⚜ *गणेशोत्सव काल आणि आज*⚜
-----------------------------------------------------
*वक्रतुंड महाकाय,सुर्यकोटी समप्रभ*
*निर्विघ्नं कुरुमेंदवो, सर्व कार्येषु सर्वदा*।
गण म्हणजे लोक,अशा गणांचा जो नायक तो गणनायक,अर्थातच गणपती.जनसामान्यांचा गणपतीबाप्पा.गणपती युद्धात सेनापती तर नृत्यकलेतही निपुण त्याचबरोबर विद्येचा दाताही आहे असे म्हणतात.अ,उ,म यांच्या अर्धमात्रेतुन ॐची निर्मिती झाली.ॐकारापासुनच विश्वाची निर्मिती झाली असे मानतात.म्हणजेच गणपती ही विश्वरुप देवता आहे.संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी
*ॐ नमोजी आद्या।वेदप्रतीपाद्या।*
*जय जय स्वयंवेद्या।आत्मरुपा।*
असं गणेशस्तवन केलेले आहे.गणपतीची मुर्ती मोठी व पोट मोठे व डोळे लहान अशी असते.भक्तांचे अपराध पोटात घालुन तो लंबोदर झाला तर वक्राचे म्हणजे दुष्टांचे तुंडन करणारा म्हणुन तो वक्रतुंड झाला.असुराशी लढताना डावा सुळा मोडला म्हणुन तो एकदंत तर भालप्रदेशावर चंद्राची कोर म्हणुन तो भालचंद्र अशी कितीतरी नांवे गणेशाला आहेत.सर्व पुजेत पहिला मान गणेशाचा.फार पुर्वीपासुन या देवतेचे पुजन लोक अगदी श्रध्देने करतात.छत्रपती शिवरायांच्या काळात देखील गणेशाची पुजा केल्याचे पुरावे आढळतात.गणेशाची आराधना करणे म्हणजे उत्सव.भाद्रपद चतुर्थीला सर्व घराघरात गणेशाची स्थापना करण्यात येते.त्याचेच औचित्य साधुन लोकमान्य टिळकांनी सन १८९६ साली या घरोघरी बसणा-या गणपतीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप दिले.टिळकांचा हा उत्सव सुरु करण्यामागे एकच हेतु होता तो म्हणजे लोकांना एकत्रित कऱणे,त्यांच्याशी संवाद साधणे.कारण १५० वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीला,अमानुष छळाला सर्व भारतीय कंटाळले होते.इंग्रज सरकार भारतीय लोकांना एकत्रित येऊ देत नसत यावर उपाय म्हणुन टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव सुरु केले.त्याला आज १२०वर्षे पुर्ण होतायेत.अशे उत्सव सुरु करणे ही त्यावेळी काळाची गरज होती.
पुर्वी गणेशोत्सव खुप कमी खर्चात साजरे व्हायचे,म्हणजे माझ्या बालपणी तर आम्ही सर्व बच्चेकंपणीच गणेशमुर्ती आणण्यासाठी कुंभारवाड्यात जायचो.कुंभाराचे भिमाकाका(आजही ते आहेत)मातीपासुन,शाडुपासुन बनविलेली रंगविरहीत मुर्ती द्यायचे.गणपतीबाप्पा मोरया म्हणतच आम्ही सर्वजण रस्त्याने गलका करत यायचो.आयाबाया खुप कुतुहलाने पहायच्या.नाहीतर आज.....गणेशाच्या मुर्तीच्या निवडीपासुन मंडळापर्यंत आणुन स्थापना करणे पर्यंत कर्णकर्कश आवाजानेच सारा परिसर दुमदुमुन गेलेला असतो.आयाबाया कुतुहलाऐवजी, चिडुनच कानावर हात ठेवुन निमुटपणे हे सारे सहन करत असतात.पुर्वीच्या गणेशमुर्ती शाडुच्या असल्यामुळे पाणी प्रदुषणाची चिंता नव्हती.आज प्लँस्टर ऑफ पँरिसच्या ,कञिम रंगीत मुर्तीमुळे पाणी प्रदुषणाची चिंता भेडसावत आहे.यात बदल होणे गरजेचे आहे.इकोफ्रेंडली मुर्तींची स्थापना करणे काळाची गरज आहे.पुर्वी च्या उत्सवात विद्युत रोषणाईचा वापर खुप कमी असायचा.आज अगदी लख्ख प्रकाशात,दिव्यांच्या झगमगाटात अनेक मंडळाने आकर्षक देखाव्यांच्या नांवाखाली विजेचा अमर्याद वापर करताना दिसत आहेत.पुर्वी मोठी मंडळे असतील तर त्याठिकाणी देखावा असायचा,छोट्या मंडळापुढे गाणी,नाटक,नकला किंवा व्ही.सी.आर वर एखादा सिनेमा,नाटक दाखवलं जायचं.गणपतीपुढे गाणी वाजायची,पण ती कर्णमधुर,भजने,मराठी हिंदी सिनेमातील गाणी,गवळणी इ.प्रकारची असायची.या उत्सवात श्रद्धेबरोबरच विचारांची देवाणघेवाण व्हायची.लोक एकत्र यायचे.
परंतु आता तर याउलट परिस्थिती पहावयास मिळतेय.दिवसेंदिवस या उत्सवाचे स्वरुप बदलु लागलेय.अगदी उंचचउंच म्हणजे पाच-सहा फुटी प्लँस्टर ऑफ पँरिसच्या मुर्ती, आणि त्या विसर्जन करण्यासाठी आहे तेवढा पाणी साठाही दुषित होऊ लागलाय.गेली तीन चार वर्षे दुष्काळी परिस्थिती पहावयास मिळतेय, त्यात मुर्ती विसर्जनातुन होणा-या प्रदुषणाची चिंता व विसर्जन करताना घडणा-या अनेक दुर्दैवी घटना याचे चिंतन करण्याची गरज आहे.विद्युत रोषणाईचा तर कहरच म्हणायचा ना!या दहा दिवसात कितीतरी मेगावँट विजेचा अपव्यय होतो.ग्रामीण भागात सध्या बारा-बारा तास विजेचे भारनियमन आहे.यामुळे शालेय विद्यार्थी व शेतक-यांचे खुप नुकसान होतेय.यासाठी प्रत्येक मंडळाने विजेचा मर्यादीत वापर केला, वीज बचत केली तर या विद्यार्थ्यांचे भविष्य घडेल,शेतीला पाणीपुरवठा झाला तर पिके चांगली येतील,शेतकरी सुखावेल.पण नाही!!!!असे होणार नाही, असं कुणी करणार नाही कारण,गणपती उत्सवाची वर्गणीच एवढी जमा होतेय की!!वर्गणी कसली...खंडणीवजा वर्गणीच म्हणायची.ती एवढी जमा होतेय की ही मंडळे आपली सद्सद् विवेकबुद्धीच हरपुम बसलेत.आपण उत्सवात गाणी कोणती ऐकवावीत याचेदेखील भान त्यांना नसते.तरुणाई तर त्यांच्या तालावर अगदी मद्यधुंद अवस्थेत थिरकत असते.काही मंडळांमध्ये तर रात्ररात्र पत्यांचे डाव खेळत असतात.वर्गणी मागण्याचे तर विविध हातखंडे ही मंडळी वापरतात.लाखोंवर वर्गणी जमा करतात.काही स्वखुशीने तर काही नाईलाजानेच वर्गणी देत असतात.याचा चुराडा या उत्सवकाळात कसा करायचा हे नियोजनबद्ध ठरलेले असते.पण काही मंडळे याला अपवाद असतात.विविध सामाजिक विषयावर प्रबोधन केले जाते.विविध उपक्रम राबविले जातात.समाज प्रबोधनपर देखावे सादर केले जातात.अशा मंडळांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असते.ज्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरु केला त्याच मार्गावर आपण आहोत का?याचे चिंतन करण्याची गरज आहे. नुकतेच माझ्या वाचनात आले की ,या दहा दिवसात १२००कोटी रुपये खर्च होतात.किती अपव्यय होतो पैशांचा!हिच रक्कम जर आपण सत्कार्यासाठी वापरली तर!म्हणजे-----
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शिक्षण,मुलींचे लग्न,कुपोषित बालकांना सकस आहार.विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत,काहींची शैक्षणिक फीस,गरीब व होतकरु मुलांना दक्तक घेणे,गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणे,विधवा व परित्यक्ता महिलांना मदत,अनाथाश्रम,वृध्दाश्रम,कुष्ठसेवाधाम इत्यादींना मदत केली तर नक्कीच ख-या अर्थाने आपण श्रद्धापुर्वक गणेशउत्सव साजरा केल्याचा जो आनंद मिळणार आहे तो दहा दिवस नाचुन धांगडधिंगाणा घालुन मिळणार नाही.याचे भान सर्वच मंडळाने ठेवावे.
यावर्षीच्या मंडळांनी तरी बदल करणे गरजेचे आहे.माझ्या मते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे,महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणुन त्यांच्या विविध स्पर्धा--रांगोळी,मेहंदी,विणकाम,भरतकाम,संगीतखुर्ची,पाककला इ.स्पर्धा घेवुन त्यांचा गुणगौरव करावा. स्त्रीभ्रुणहत्या,वृक्षारोपण,अवयवदान,इ.विषयाचे प्रबोधन मंडळाकडुन व्हावे.मिरवणुक साध्या पद्धतीन व शिस्तबद्ध काढावी.एक गांव एक गणपती ही संकल्पनाराबवावी.छोट्या मुर्ती चे विसर्जन करावे,दोन तीन वर्षे एकच मुर्ती वापरावी.यानंतरही वर्गणी शिल्लक राहीली तर पुढील वर्षी त्याचा वापर करावा किंवा वर्षभरात एखादी दुर्दैवी घटना दुर्दैवाने घडली तर मदत करावी.दिर्घ आजारी व्यक्तींच्या औषधोपचारासाठी त्या कुटुंबास हातभार लावावा व येणा-या नवीन पिढीसमोर एक आदर्श घालुन द्यावा.जशी आपण गणेशाच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत तशीच गणेशोत्सवाची वाट येणा-या पिढीने पहावी.सर्वांनी तोंडभरुन कौतिक करावे असे कार्य करुन आपण आदर्श घालुन द्यावा एवढीच माफक अपेक्षा!
**************************************************
✍🏻 *संगीता भांडवले*✍🏻
मुख्याध्यापिका
जि प प्रा शाळा शेंडी
*ता .वाशी जि. उस्मानाबाद*
मोबा.नं.९९२३४४५३०६
Sunday, September 4, 2016
गणेशोत्सव काल आणि आज
Subscribe to:
Post Comments (Atom)
प्रबोधनात्मक,👍👍👍
ReplyDelete👌👍👍
ReplyDelete