Sunday, November 27, 2016
जागतिक एडस दिनानिमित्त लेख-भरकटलेली युवापिढी
Sunday, November 13, 2016
पाल्यांचे करिअर,स्वप्न की स्वप्नांचे ओझे
*पाल्याचे करियर , स्वप्न की स्वप्नांचे ओझे*
आजचे पालकत्व ही अतिशय नाजुक आणि संवेदनशील बाब आहे.मुलांचे संगोपन आणि शिक्षण हा सर्व पालकांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.'स्वप्न'म्हणजे सुचक गोष्टींचा गुंतावळा आहे.प्रत्येक व्यक्तीनुसार सुचक गोष्टींचा अर्थ वेगळा असतो.हाच गुंतावळा ,अपेक्षा चे ओझे मग पाल्यावर लादले जाते.पालकांना अपेक्षा असते आपल्या मुलांनी खुप मोठे व्हावं.नांव कमवावं.सध्या प्रत्येक घरात दोनच मुले आहेत.शिक्षणाचा वाढता खर्चही पालक करु शकतात.अगदी कितीही भरमसाठ फीस असली तरीही.आपले स्वप्न पुर्ण करण्याच्या नादात नकळतपणे स्वप्नांचे ओझे पाल्यावर लादले जाते.काही मुले हा पालकांच्या स्वप्नांचा भवसागर पार करतातही पण काहींच्या पदरी मात्र निराशा येते आणि यातुन अनेक प्रसंगांना ,समस्यांना या पालकांना सामोरे जावे लागते.जिकडे पहावं ति्कडे स्पर्धा सुरु आहे.सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे .अगदी याची सुरुवात बालवयापासुनच म्हणजे तीन वर्षापासुन मुलांना जीवघेण्या स्पर्धेला सामोरे जावे लागतेय हे वास्तव आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले आहे.अगदी ग्रामीण भागात ही ३ वर्षापासुनची मुले या प्रवाहात आहेत.त्यांच्या बालपणावर हा अन्यायच आहे. तिथुनच पालकांच्या अपेक्षांचे ओझे मुलांच्या खांद्यावर देऊन पालक त्याच्या भविष्याची स्वप्ने रंगवण्यास सुरुवात होते.खाजगी क्लास,विविध शिबिरे दिवसभर ही मुले बाहेरच असतात.त्यांच्या वेळापत्रकात ना खेळाला जागाe,ना कुणाशी संवादास जागा.जेवढा रिकामा वेळ मिळतो तो टि व्ही,संगणक,मोबाईललाच मिळतो.
आईवडिलांना मुलांच्या शिक्षणावरुन खुप ताण येतो.ह्याचे कारण म्हणजे शिक्षणाबद्दलची आस्था.दुर्दैवाने शिक्षणापेक्षा सध्या स्टेस्ट्सलाच महत्व दिले जात असल्यामुळेच.व .पु .च्या भाषेत सांगायचे म्हणले तर "लोक काय म्हणतील" यालाच बरेचजण घाबरतात.वास्तविक ९०च्या दशकातील सुरुवातीच्या काळापर्यंत अशी काहीशी अवस्था होती की जर डॉक्टर अथवा इंजिनिअर नसलो तर पोटापाण्याचे काय होणार.पण आता तसे खरेच आहे का???मुलांना नक्की काय आवडते.त्याचा कोणत्या विषयाकडे कल आहे याचा सर्वच पालकांनी विचार करायला हवा.पाल्यांना स्वत:चे विचार स्वतंत्र चांगले करु शकतील एवढे संस्कार द्या.कुठल्यातरी पुढा-याच्या बोडक्यावर डोनेशन फीस घालुन वरुन अजुन काही लाख रु.केवळ डिग्रीसाठी घालवण्याची गरज नाही.जर सुदैवाने एवढं सारं करण्याची आर्थिक परिस्थिति असली तर त्या परिस्थिती चा चांगला फायदा घेवुन मुलांना जे आवडते ते शिकु द्या.वेळ प्रसंगी रिस्क घेण्यास शिकवावे.त्यातुनच तो जीवनात यशस्वी व तरबेज होईल.शैक्षणिक यश हे आयुष्यातील यशास फक्त १०%कारणीभुत ठरते.समाजात अशी कितीतरी उदाहरणे सापडतील की ज्यांचे शिक्षण वेगळ्या विषयाच झाले अन् व्यवसाय दुस-याच विभागात करतात. अगदी डॉक्टर झालेली मंडळी अभिनय क्षेत्रातही दिसतील. उदा.डॉ.निलेश साबळे.डॉ.अमोल कोल्हे.
परंतु काही वेळा पालकांनी जरी पाल्यास समजुन घेतले.अपयशानंतर खचुन न जाता धिर दिला तरी आपल्या आजुबाजुचा समाज त्यास स्वस्थ बसु देत नाही.उदा.शिक्षक किंवा डॉक्टर दांम्पत्य असेल तर.....
* तुम्ही दोघे नोकरदार ,किंवा शिक्षक असुन मुलाला ऐवढे कमी मार्कस् कसे आले??
* आता तुमच्या मुलाचे कसे होणार??
* त्याला आता ही साइड झेपेना,तुम्ही उगीच त्याला तिकडे टाकले,या...साइडला टाकले असते तर बरे झाले असते??
* तुंम्हाला काय पैशाचा प्रॉब्लेम नाही म्हणा,अमुक अमुक ठिकाणी डोनेशन भरुन अॅडमिशन घ्या!!
* तुम्ही त्याला रिपीट करु द्या ऐवढे वर्ष!
असे आणि याहुनही भयानक फुकटचे सल्ले आजुबाजुची ही मंडळी देत असतात.पण अशा सल्ल्यामुळे तो विद्यार्थी किंवा त्याच्या पालकावर काय ताण येईल ?ही मंडळी जरासुद्धा विचार करत नाहीत आणि अशातच ही पालकमंडळी आपल्या स्वप्नांचे ओझे मुलांवर लादत असतात.पालकांना हवे असलेल्याच शिक्षणास पाल्यांना प्रवेश देतात .काहीजण तर चक्क म्हणतात मला डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे होते,त्यावेळची आमची घरची परिस्थिती किंवा तत्सम कारण सांगतात व ते स्वप्न आम्ही तुझ्यात पाहतोय म्हणुन तु हेच हो... असं म्हणतात.त्या मुलाचा कल,आवड पाहिली जात नाही.तो अभ्यासक्रम मग त्यास पेलवत नाही ,ताण येतो आणि त्यातुनच नैराश्य येवुन अनेक दुर्दैवी घटना घडतात.त्या आत्महत्या असो की व्यसन!त्यास पालकांच्या अपेक्षेचे ओझेच जबाबदार आसते.
आपल्या मुलाचे शैक्षणिक यश हे सध्या पालकाच्या प्रतिष्ठेचा विषय बनत आहे.काही ठिकाणी मुलांना परिक्षेत कमी गुण आले तर घरात अगदी सुतकी वातावरण दिसते किंवा त्या मुलाने काही एखादा गंभीर गुन्हा केल्यासारखे त्याला स्वत:च्याच घरात वागणुक मिळते.हा स्वप्नांचा बाजार मुलांना कुठे घेऊन जाणार आहे? पालकांनी मुलांबरोबर मित्रत्वाचे नाते ठेवावे.वेळोवेळी मार्गदर्शक बनावे.हीच एक माफक अपेक्षा.
संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
Sunday, November 6, 2016
सेल्फी विथ गुरुजी
शासन निर्णय आणि बदलती शिक्षण पद्धती
-------------------------------------------_---------
*सेल्फी विथ गुरुजी*
================
'सेल्फी विथ गुरुजी'हा शासन निर्णय. या निर्णयानुसार शिक्षकांना दर सोमवारी मुलांसोबत १०-१० विद्यार्थ्यांचा गट करुन सेल्फी काढुन तो 'सरल'प्रणालीवर अपलोड करावयाचा आहे.त्यामुळे येत्या जानेवारीपासुन शाळेच्या आठवड्याचा पहिला तास म्हणजे दर सोमवारी पहिला तास हा सेल्फी तासच ठरणार आहे.या निमित्ताने एक गाणे आठवले.चल बेटा सेल्फी लेले रे.......पण सोमवारी शाळेत गुरुजी जाताच शाळेतली मुलं 'चल गुरुजी सेल्फी लेले रे.'........असं म्हंटली तर अजिबात नाराज होऊ नका.कारण आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनीच तसा शासन निर्णय ३नोव्हेंबर २०१६ ला काढलाय अन् ऐनदिवाळीतच स्मार्ट फोनच्या जमान्यात 'स्मार्ट दिवाळी सेल्फी धक्का'दिलाय.
विद्यार्थ्यांची गळती व गैरहजेरी कमी करण्याचे कारण दाखवुन हा शासन निर्णय काढला आहे.उद्देश चांगला आहे पण त्यासाठी 'सेल्फी विथ गुरुजी'च का?गळती व गैरहजेरीचा अन् सेल्फीचा काय संबंध येत नाही तर या प्रक्रियेमुळे शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा विनाकारण वेळ जाणार असुन सरलमध्ये ही माहीती अपलोड करण्यासाठी मुख्याध्यापकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
सध्या वेळोवेळी बदलत्या विविध शासन निर्णयानुसार --सरलच्या नावावर संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांची संपुर्ण माहीती अपलोड करणे,विद्यार्थ्यांचा दाखला ऑनलाईन देवाणघेवाण करणे,शिक्षकांची माहीती, शाळेतील सर्व सोयीसुविधांची माहीती, मध्यान्ह भोजन योजनेतील लाभार्थ्यांची माहीती, विविध शिष्यवृत्यांची माहीती, इन्स्पायर ऍवॉर्ड,स्वच्छ भारत विद्यालय योजनेची माहीती ऑनलाईन करण्याची कामे शिक्षकांना आहेत त्यातच ही सेल्फीची भर.यात वेळ व पैसा या दोहोंचा अपव्यय आहे.
वेगवेगळ्या प्रकारची माहीती दररोज प्रशासनाकडुन ऑनलाईन व त्याची लिखित प्रत मागीतली जाते.त्यामुळे शाळेतील दोन शिक्षक या कामी व्यस्त असतात.तर दोन शिक्षकी शाळेवर एक शिक्षक शाळेवर व दुसरा माहीती गोळा करण्यात अशीच अवस्था असते.राज्यातील बहुतांशी शाळा या द्विशिक्षकी शाळा आहेत.या सर्वांचा परिणाम अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे खुपमोेठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या सेल्फी मुळे शिक्षकांच्या हाती आता सेल्फी स्टिक येणार आहे.'छडी लागे छमछम विद्या येई घमघम'ऐवजी आता 'सेल्फी स्टिक येई हाती-गुरुजी मुलांच्या फोटोची हौस भागवती'किंवा 'गुरुजी सेल्फी स्टिक हाती लागले धरु-म्हणतील मुले त्यांना अहो!सेल्फी गुरु'असे म्हंटले तर वावगे होणार नाही.
सध्याचे युग हे माहीती तंत्रज्ञानाचे युग आहे.सर्वजण स्मार्ट फोनचा वापर करतात.डिजीटल शाळा,क्लासरुम,लोकसहभागातुन बनवल्या आहेतच.अनेक शिक्षकांनी स्वत:चे ब्लॉग,अॅप, बनवले आहेत. परंतु ग्रामीण भागात वाड्या वस्त्यावर,तांड्यावर काम करणारा शिक्षक ही कामे करु शकत नाही.त्यास तंत्रज्ञानाची ओळख नाही असे नव्हे तर या सर्व कामासाठी त्याला खुप धावपळ करावी लागते.ब-याच ठिकाणी नेटवर्क नाही,नेटकॅफेवर ही माहीती भरायची म्हणले तर ऱोज जवळजवळ ५०₹ खर्च येतो.यासाठी कसलाही निधि उपलब्ध नाही.अशा परिस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे का हिच कामे करायची. याचा विचार तरी कोण करेल?शिक्षकांना शिकवु द्या.ऑनलाईन कामासाठी इंटरनेट व कॉम्प्युटर जोपर्यंत शासन पुरवत नाही तोपर्यंत तरी हे शक्य नाही असे वाटते.आधीच 'सरल'ची माहीती भरुन गुरुजी पार 'वाकडा'झालाय.त्यातच हातात ही सेल्फी स्टिक.
सध्या 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' करण्याचा ध्यास गुरुजींनी घेतला आहे.येत्या डिसेंबर आखेर 'प्रगत शै महाराष्ट्र' करण्याचे स्वप्न गुरुजी पाहत आसतानाच हा शासन निर्णय.शिक्षक व विद्यार्थ्यांत दुरावा येऊ नये असे निर्णय घ्यावेत.त्याचे स्वागतच होईल.कारण सध्या'शिक्षक ऑनलाईन व शाळा ऑफलाईन'अशीच स्थिती या विविध ऑनलाईन कामामुळे झाली आहे.अशा वेळोवेळी बदलत्या शासन निर्णयामुळे काय साध्य होणार आहे.शहरी विभाग व ग्रामीण विभाग या दोन्हींचा विचार करुन शासन निर्णय काढायला हवेत.सेल्फी असो की पाठीवरील दफ्तराचे ओझे .शहरी भागात यास काहीच अडचण येत नसावी.ग्रामीण भागात वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते.जिथे १२-१२तास विजेचे सततचे भारनियमन असते,शाळेचे विज कनेक्शन बिलाअभावी खंडीत केले आहे,जिथे साध्या फोनलाही रेंज येत नाही तिथे ऑनलाईन कामाची अपेक्षा?किती विरोधा भास हा.तरीही खाजगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांची प्रगती निश्चितच चांगली झालेली आहे. सध्या ज्ञानरचनावाद पद्धतीत विविध कौशल्ये वापरुन गुरुजी प्रगती करत असतानाच अशा निर्णयाने त्याची भंबेरी उडाली आहे.त्या गुरुजीला ताणतणावमुक्त जगु द्या!त्याला समजुन घेण्याची गरज आहे. त्याच्या मानसिकतेचाही विचार करणे गरजेचे आहे.नसता गुरुजी काही दिवसातच 'निरोगी ऐवजी मनोरोगी'होण्यास वेळ लागणार नाही.कुठेतरी विचार करण्याची गरज आहे.
संगीता भांडवले
प्रा शा शेंडी
ता वाशी जिउस्मानाबाद
Email-iamsangitabhandwale@gmail.com
Blog-myshikshankatta.blogspot.com