पत्रलेखन
❇❇❇❇❇❇❇❇❇❇
*विषय:आईस पत्र*
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
तिर्थरुप सौ.आईस,
माझा शिरसाष्टांग नमस्कार.वि.वि.पत्र लिहिण्यास कारण की,मला व मुलांना १मे पासुन उन्हाळी सुट्या लागल्या आहेत.सुट्टी म्हणलं की मुलांना वेध लागतात ते मामाच्या गांवचे.म्हणुन म्हंटलं चला पत्र लिहुया!
काय गं आई,खुप वाट पाहत असतेस ना तु ही सुट्टीची!जशी मुलं वाट पाहत असतात मामाच्या गांवची,तशीच तु ही वाट पाहत असतेस ना नातवंडाची.का नाहीस पाहणार.वर्षभर तुझ्या मुली त्यांच्या संसारात इतक्या रमलेल्या असतात की,अधुन मधुन फोन करणंही जमत नाही,मग तु खुप चिडलेली असतीस म्हणे.वहिनींशी बोलने होते माझे.नातवंडाला काय आवडते याची यादीच तोंडपाठ असते ना तुझी.वयोमानानुसार तुझे शरीर थकले पण मन अजुनही तरुण आहे.आंम्हाला वेळोवेळी तु दिलेल्या सल्ल्यातुनच सांसारिक जबाबदा-या पार पाडताना ऊर्जा मिळत असते.
खरंच आई,तु आयुष्यभर आंम्हा भावंडासाठी खुप खस्ता खाल्यास,जिवन हे सुखदु:खाच्या धाग्यांनी बनलेले असते.तुलाही आयुष्यात खुप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला.पण तु हसतमुखाने त्यातुन मार्ग काढायचीस.शेतीवर अवलंबुनच आपलं घर कसंबसं चालायचं.त्यातुनच तु बचत ही करायचीस व आम्ही शिकुन खुप मोठं व्हावं असं तुला नेहमी वाटायचं.तुझी ती तळमळ मला आज एक आई म्हणुन जगताना जाणवतेय.
आई सुरुवातीच्या काळात मलाही पैशाची चणचण खुप भासायची.त्यात घर,मुलाचं शिक्षण,पै-पाहुणे यात तारांबळ उडायची गं!पण त्यावेळी मला तु आठवायचीस.मनाला धिर वाटायचा.पण तुझ्या खंबीरपणामुळे पुन्हा मनात नवसंचार ,नवचैतन्य यायचं.
सॉरी आई,तु नेहमी माझ्यावर रागावतेस ना,पण काय करु माझ्या संसारात मी इतकी रमलेय ना की कधी फोन करायला,सतत येऊन भेटायला वेळच मिळत नाही गं!शाळेची कामं,घरची कामं,वाचन लेखन,छंद जोपासण्यात,आदर्श आई,आदर्श पत्नी,अादर्श गृहीणी बणन्यातच माझा दिवस कसा जातो तो कळतच नाही गं!
आई १०-११ वर्षापुर्वी आपल्या घरावर खुप मोठा दु:खाचा डोंगर कोसळला. तुझा मोठा मुलगा सतीश आपणातुन कायमचा दुर गेला.पुत्रवियोगाने तु अंथरुणात खिळलीस.बरेच अाजार तुझ्या शरिरात नांदु लागले.पण ईश्वराने जसे दु:ख दिले तसेच त्यातुन सावरण्याची ताकद ही दिली.आज गोळ्या औषधावर का होईना पण तु आमच्यात आहेस ह्यातच आंम्ही भावंड देवाचे खुप खुप आभार मानतो.पुन्हा दु:खाने तुझी पाठ सोडली नाही.मोठ्या ताईचा मुलगा, तुझा नातु सौरभ ही या जगाचा कायमचा निरोप घेऊन आपल्यातुन निघुन गेला.त्यात तु पुन्हा खचलीस व आजही ही दोन्ही दु:ख घेऊन तु आमच्यासोबत सुखात असल्याचे भासवत आनंदाने जगत अाहेस.आई, मी कधी कधी तुझ्यावर खुप रागावते ना!पण काय करु,मला ते करावं लागतं.कारण त्याशिवाय तु डॉक्टरांकडे जात नाहीस की औषधे घेत नाहीस.
आई ,तुझी तक्रार ही मला मान्य आहे,कारण सासर-माहेर व नौकरी एकाच गावात असल्यामुळे मला सतत तुझ्याकडे यायला की फोन करायला जमत नाही.तुला वाटतं मी सतत यावं.पण कार्यालयीन व सांसारिक जबाबदारी पार पाडताना मी कुठे कमी पडु नये अशीच धडपड असते गं माझी.म्हणुन नाही येत सारखी माहेरी.आई-बाबा तुम्ही अानंदात आहात ना!तुमची सुन मुलीसारखी काळजी घेते.मुलगाही तुंम्हाला खुप जपतो.म्हणुन मी खुशालचेंडुसारखी कधीतरी येऊन जातेय ना!तुझ्या हातचं काहीतरी खाऊन जातेय ना!
बरंय आई,, खुप खुप लिहायला सुचतयं,कारण आपण एकाच गावात राहत असल्यामुळे कधी पत्र लिहायला मिळालेच नाही पण या निमित्ताने तरी मी माझ्या भावना व्यक्त करु शकले.
तु दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवरच मी जिवनात यशस्वी होत आहे.तुझे ऋण मी कसे फेडु.....
बरे असो,खुप लिहितेय,मनातलं कागदावर उमटवतेय.काळजी घे!दुधावरची साय म्हणजे तुझी नातवंड कशी आहेत.आत्याचा गोडगोड पापा सांग.लवकरच भेटेन.....
तुझीच लाडकी लेक
*सौ.संगीता*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~````
संगीता भांडवले
वाशी उस्मानाबाद
अप्रतिम पञलेखन
ReplyDeleteछान
ReplyDeleteछान
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteखूप छान.
ReplyDeleteNice mam 👌🏻👌🏻
ReplyDelete