Wednesday, November 27, 2019

कविता ।।परतीचा पाऊस।।

।। परतीचा पाऊस।।

कुठे धो-धो तर कुठे हुलकावणी
कंटाळली सारी जनता
पावसाच्या लहरीपणाला
कुठे येतं काय म्हणता?   ।। १।।

जिथं पडला तिथं महापूर
अनेकांचे संसार झाले उध्वस्त
खोट्या आश्वासनांचे  नाटक करत
पुढारी मात्र प्रचारात व्यस्त        ।। २।।

परतीच्या पावसानं
सुगी भिजली सारी
कशाचा दसरा अन् दिवाळी
बळीराजा पुढं फासाची  दोरी   ।। ३।।

कापूस, तूर, मका, बाजरी
सोयाबीन गेलं पाण्यात
हातातोंडाशी आलेला घास
वाहून गेला वैरी पावसात       ।। ४।।

पीक पंचनामे, सरकारी मदतीची
गाजरंच  दाखवतायेत जास्त
सत्ता स्थापनेचा सुटेना  तिढा
म्हणे, बळीराजा तुझ्या पाठीवर आमचाच
हस्त।। ५।।

साहेब, खोट्या आश्वासनांचीच
माझ्या अंगवळणी पडली सवय
पोरं-बाळं अन्  जित्राबासाठीच
मला जीवन जगायला हवंय....
      मला जीवन जगायला हवंय...।। ६।।

श्रीमती भांडवले संगीता
वाशी उस्मानाबाद
९९२३४४५३०६

No comments:

Post a Comment