शासन निर्णय आणि बदलती शिक्षण पद्धती
-------------------------------------------_---------
*सेल्फी विथ गुरुजी*
================
'सेल्फी विथ गुरुजी'हा शासन निर्णय. या निर्णयानुसार शिक्षकांना दर सोमवारी मुलांसोबत १०-१० विद्यार्थ्यांचा गट करुन सेल्फी काढुन तो 'सरल'प्रणालीवर अपलोड करावयाचा आहे.त्यामुळे येत्या जानेवारीपासुन शाळेच्या आठवड्याचा पहिला तास म्हणजे दर सोमवारी पहिला तास हा सेल्फी तासच ठरणार आहे.या निमित्ताने एक गाणे आठवले.चल बेटा सेल्फी लेले रे.......पण सोमवारी शाळेत गुरुजी जाताच शाळेतली मुलं 'चल गुरुजी सेल्फी लेले रे.'........असं म्हंटली तर अजिबात नाराज होऊ नका.कारण आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनीच तसा शासन निर्णय ३नोव्हेंबर २०१६ ला काढलाय अन् ऐनदिवाळीतच स्मार्ट फोनच्या जमान्यात 'स्मार्ट दिवाळी सेल्फी धक्का'दिलाय.
विद्यार्थ्यांची गळती व गैरहजेरी कमी करण्याचे कारण दाखवुन हा शासन निर्णय काढला आहे.उद्देश चांगला आहे पण त्यासाठी 'सेल्फी विथ गुरुजी'च का?गळती व गैरहजेरीचा अन् सेल्फीचा काय संबंध येत नाही तर या प्रक्रियेमुळे शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा विनाकारण वेळ जाणार असुन सरलमध्ये ही माहीती अपलोड करण्यासाठी मुख्याध्यापकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
सध्या वेळोवेळी बदलत्या विविध शासन निर्णयानुसार --सरलच्या नावावर संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांची संपुर्ण माहीती अपलोड करणे,विद्यार्थ्यांचा दाखला ऑनलाईन देवाणघेवाण करणे,शिक्षकांची माहीती, शाळेतील सर्व सोयीसुविधांची माहीती, मध्यान्ह भोजन योजनेतील लाभार्थ्यांची माहीती, विविध शिष्यवृत्यांची माहीती, इन्स्पायर ऍवॉर्ड,स्वच्छ भारत विद्यालय योजनेची माहीती ऑनलाईन करण्याची कामे शिक्षकांना आहेत त्यातच ही सेल्फीची भर.यात वेळ व पैसा या दोहोंचा अपव्यय आहे.
वेगवेगळ्या प्रकारची माहीती दररोज प्रशासनाकडुन ऑनलाईन व त्याची लिखित प्रत मागीतली जाते.त्यामुळे शाळेतील दोन शिक्षक या कामी व्यस्त असतात.तर दोन शिक्षकी शाळेवर एक शिक्षक शाळेवर व दुसरा माहीती गोळा करण्यात अशीच अवस्था असते.राज्यातील बहुतांशी शाळा या द्विशिक्षकी शाळा आहेत.या सर्वांचा परिणाम अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे खुपमोेठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या सेल्फी मुळे शिक्षकांच्या हाती आता सेल्फी स्टिक येणार आहे.'छडी लागे छमछम विद्या येई घमघम'ऐवजी आता 'सेल्फी स्टिक येई हाती-गुरुजी मुलांच्या फोटोची हौस भागवती'किंवा 'गुरुजी सेल्फी स्टिक हाती लागले धरु-म्हणतील मुले त्यांना अहो!सेल्फी गुरु'असे म्हंटले तर वावगे होणार नाही.
सध्याचे युग हे माहीती तंत्रज्ञानाचे युग आहे.सर्वजण स्मार्ट फोनचा वापर करतात.डिजीटल शाळा,क्लासरुम,लोकसहभागातुन बनवल्या आहेतच.अनेक शिक्षकांनी स्वत:चे ब्लॉग,अॅप, बनवले आहेत. परंतु ग्रामीण भागात वाड्या वस्त्यावर,तांड्यावर काम करणारा शिक्षक ही कामे करु शकत नाही.त्यास तंत्रज्ञानाची ओळख नाही असे नव्हे तर या सर्व कामासाठी त्याला खुप धावपळ करावी लागते.ब-याच ठिकाणी नेटवर्क नाही,नेटकॅफेवर ही माहीती भरायची म्हणले तर ऱोज जवळजवळ ५०₹ खर्च येतो.यासाठी कसलाही निधि उपलब्ध नाही.अशा परिस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे का हिच कामे करायची. याचा विचार तरी कोण करेल?शिक्षकांना शिकवु द्या.ऑनलाईन कामासाठी इंटरनेट व कॉम्प्युटर जोपर्यंत शासन पुरवत नाही तोपर्यंत तरी हे शक्य नाही असे वाटते.आधीच 'सरल'ची माहीती भरुन गुरुजी पार 'वाकडा'झालाय.त्यातच हातात ही सेल्फी स्टिक.
सध्या 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' करण्याचा ध्यास गुरुजींनी घेतला आहे.येत्या डिसेंबर आखेर 'प्रगत शै महाराष्ट्र' करण्याचे स्वप्न गुरुजी पाहत आसतानाच हा शासन निर्णय.शिक्षक व विद्यार्थ्यांत दुरावा येऊ नये असे निर्णय घ्यावेत.त्याचे स्वागतच होईल.कारण सध्या'शिक्षक ऑनलाईन व शाळा ऑफलाईन'अशीच स्थिती या विविध ऑनलाईन कामामुळे झाली आहे.अशा वेळोवेळी बदलत्या शासन निर्णयामुळे काय साध्य होणार आहे.शहरी विभाग व ग्रामीण विभाग या दोन्हींचा विचार करुन शासन निर्णय काढायला हवेत.सेल्फी असो की पाठीवरील दफ्तराचे ओझे .शहरी भागात यास काहीच अडचण येत नसावी.ग्रामीण भागात वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते.जिथे १२-१२तास विजेचे सततचे भारनियमन असते,शाळेचे विज कनेक्शन बिलाअभावी खंडीत केले आहे,जिथे साध्या फोनलाही रेंज येत नाही तिथे ऑनलाईन कामाची अपेक्षा?किती विरोधा भास हा.तरीही खाजगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांची प्रगती निश्चितच चांगली झालेली आहे. सध्या ज्ञानरचनावाद पद्धतीत विविध कौशल्ये वापरुन गुरुजी प्रगती करत असतानाच अशा निर्णयाने त्याची भंबेरी उडाली आहे.त्या गुरुजीला ताणतणावमुक्त जगु द्या!त्याला समजुन घेण्याची गरज आहे. त्याच्या मानसिकतेचाही विचार करणे गरजेचे आहे.नसता गुरुजी काही दिवसातच 'निरोगी ऐवजी मनोरोगी'होण्यास वेळ लागणार नाही.कुठेतरी विचार करण्याची गरज आहे.
संगीता भांडवले
प्रा शा शेंडी
ता वाशी जिउस्मानाबाद
Email-iamsangitabhandwale@gmail.com
Blog-myshikshankatta.blogspot.com
No comments:
Post a Comment