⚽ *शालेय जिवनात खेळाचे महत्व*⚽
*****************************
आरोग्य हा मुलांच्या सर्वांगीण विकासामधील एक महत्वाचा घटक आहे.मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्याचे स्वास्थ्य चांगले असणे आवश्यक आहे.बदलत्या जिवनशैलीमुळे सर्वांचेच शारिरिक कष्ट कमी झाले आहे.सध्याचे युग हे माहीती व तंत्रज्ञानाचे युग आहे.या युगामध्ये शारिरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम नागरिक तयार करणे आज आव्हान बनले आहे.तंत्रज्ञानाशिवाय तर पर्याय नाही.माणुस हा बुद्धीवान प्राणी.तो आपल्या बुद्धीच्या जोरावर आजुबाजुचे वातावरण बदलतो आहे.मात्र या सर्व बदललेल्या जिवनशैलीमुळे माणसाचे शारिरिक कष्ट व शुद्ध मोकळी हवा यापासुन कोसो दुर गेला आहे.आज सर्वच वयोगटातील व्यक्तीवर निरनिराळे ताणतणाव दिवसेंदिवस वाढत आहेत.परिणामी मानसिक,शारिरिक, भावनिक असंतुलन वाढत आहे.त्यामुळे समाजामध्ये अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे.
" *आरोग्यम् धनसंपदा*"
वास्तविक पाहता आपले शरीर ही आपली मौलिक संपत्ती आहे.म्हणुन तिची ओळख करुन घेणे ,नियमित व्यायाम करुन घेणे ,त्याची सवय अंगी बाणने हे आपले कर्तव्य आहे.म्हणुनच शालेय जिवनापासुनच या सवयी विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले नसेल तर त्याची वाढ व विकास चांगला होत नाही.विद्यार्थ्याच्या अंगी असणा-या प्रचंड ऊर्जेला विविध खेळातुन जो वाव व दिशा मिळते याचा सध्या अभाव दिसतो आहे.
विविध शारिरिक हालचालींमुळे,खेळांमुळे मुलांवरील ताणतणाव कमी होतो.खेळ ही मुलांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि आनंदी व तणावरहित मुले जास्त कार्यक्षम असतात.म्हणुनच शालेय जिवनात खेळाचे महत्व अनन्यसधारण आहे.
लहान मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते.म्हणुनच खेळाची आवड ही बालवयापासुनच लावली पाहिजे.प्राथमिक स्तरापासुन विविध खेळात तो समरस झाला पाहिजे.खेळामुळे शिस्त,जिद्द हे गुण वाढीस लागतात.परंतु आज विद्यार्थ्यांच्या वास्तविक गरजा व त्यांची आवड याकडे दुर्लक्ष होत आहे.
विद्यार्थ्यांची एकमेव योग्यता पारखण्याचे मापदंड म्हणजे परिक्षेत मिळणारे गुण अशी परिस्थिती आज बहुतेक घरात असल्यामुळे मुलांना शाळा व क्लास,व्हिडीओगेम,बदललेल्या तंत्रज्ञानाचा वापर ,यात संगणक,मोबाइल.या सर्वांमध्ये तो मैदानी खेळ खेळणे पार विसरुनच गेला आहे.मैदानी खेळसुद्धा मोबाइल, संगणकावरच ही मुले खेळत आहेत.त्यामुळे शुद्ध हवा घेणे तर दुरच!या सर्वांतुन विद्यार्थ्यांची नैसर्गिक वाढ ,विकास,अंगभुत क्षमता त्यांच्या मानसिक,भावनिक व सामाजिक गरजा लक्षात येत नाहीत.परिक्षेतील गुण म्हणजे पुढील आयुष्यात यश आणि समाधान मिळविण्याचा एकमेव मार्ग मुळीच नाही.जिवनात यश प्राप्त करायचे असेल तर वेळेचे नियोजन,समुहात काम करण्याची क्षमता,स्वत:च्या व इतरांच्या भावना समजणे,इतरांशी संवाद साधता येणे,नेतृत्वगुण असणे,ताणतणाव हाताळता येणे यासारखी अनेक जिवनकौशल्य अंगी असवी लागतात.ही सर्व कौशल्य मैदानावर ,समुहात खेळताना आपोआपच नकळत अंगी बाणली जातात.विकसित होतात.तसेच जिद्द,चिकाटी,मैत्री, विश्वबंधुत्वाची भावना ,खिलाडुवृत्ती यासारखे गुण मैदानावर खेळ खेळताना विकसित होत असतात.याबरोबरच व्यक्तीमत्व विकसित करणारे अनेक इतर सामाजिक गुण देखील विद्यार्थी नकळत आत्मसात करतात.म्हणुन शालेय जिवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
बालवयापसुनच नियमितपणे खेळ खेळण्याची गोडी लावल्यास त्यातुनच उत्कृष्ट क्रिडापटु तयार होतील.म्हणुन शालेय वेळापत्रकातील खेळाच्या तासिका खेळ घेऊन आपण उत्कृष्ट क्रिडापटु घडवुयात!नियमितपणे खेळ घेऊयात!नियमितपणे दिर्घकाळ येणारी मानसिक व शारिरिक कणखरता ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर व्यक्तीची हक्काची संपत्ती असते.यावरुन शालेय जिवनात प्राथमिक टप्प्यावरच शारीरिक शिक्षण दररोज असणे ही विद्यमान व भविष्यकाळाची गरज आहे.आपण " *किती जगतो यापेक्षा कसे जगतो* "याला महत्व आहे.
शालेय जिवनातच विद्यार्थ्याची शारिरिक सदृढता व मानसिक आरोग्य विकसित झाले पाहिजे.आरोग्यविषयक सवयीची जाण असली पाहिजे.समाजात मिळुनमिसळुन राहणे व आनंदाने उत्साहाने आपली नित्य कामे करता येणे आणि नितीमुल्यांची जोपासना करुन जिवनभर खिलाडुवृत्तीने राहणे यासारख्या बाबींदेखील साध्य करायच्या आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी व शाळेत टिकवुन ठेवण्याची क्षमता खेळामध्ये आहे. म्हणुन शालेय जिवनातच खेळाची सवय अंगी असणे आवश्यक आहे. त्यासाठी भोवतालच्या परिसरात खेळल्या जाणा-या खेळांचा समावेश शाळेमधेही करण्यात यावा.शाळाभरण्यापुर्वी व नंतर मैदानावरील काही खेळ घ्यावेत.यासाठी विशेष प्राविण्य मिळविण्यासाठी उन्हाळी,दिवाळी सुट्ट्यांमध्ये खेळशिबिरे घ्यावीत.मुलांचा जास्तीत जास्त रिकामा वेळ खेळातच घालवावा.कारण आज बहुतांशी घरात मुले खेळायचे म्हंटलं तरी त्यांना पालक परवानगी देत नाहीत.मुलांवर अभ्यासाचा ताण असतो.पालकाचा धाक असतो.म्हणुन शाळेनेच विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त खेळाच्या तासिकेत विविध खेळाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना तणावमुक्त करुन त्यांच्या अंगी असणा-या सुप्त क्षमतांचा विकास होईल व शाळेकडुन विद्यार्थ्यांना उत्तम खेळाडु बनन्याची संधी मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
****************************************************🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀🏀
✍🏻संगीता भांडवले✍🏻
मुख्याध्यापिका
जि प प्रा शा शेंडी
ता वाशी जि उस्मानाबाद