Sunday, October 23, 2016

शेतकरी जगला तर;देश टिकेल(वैचारिक लेख)

शेतकरी जगला तर ; देश टिकेल! भारत हा शेतीप्रधान देश आहे.शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.भारतातील जवळ जवळ ७०%लोकांची उपजिविका शेतीवर अवलंबुन आहे.शेतकरी हा भारताचा अविभाज्य घटक आहे.परंतु या शेतीप्रधान देशातील शेतकरी,जो जगाचा पोशिंदा आहे.तोच नेहमी निसर्गाच्या चक्रात सापडतो.कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ ,कधी महापुर,कधी वादळ,तर कधी गारपीठ.या सा-या संकटांचा त्याला वेळोवेळी सामना करावा लागतो.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे जेंव्हा हिसकावुन घेतला जातो.तेंव्हा तो शेतकरी अपयशाने खतुन जातो.त्याचं अंध:कारमय भविष्य त्याला दिसतं अन् नकळतपणे आपला संसार उध्वस्त करुन ,आपले कुटुंब वा-यावर सोडुन मृत्युला कवटाळतो.तेंव्हा खुप वाईट वाटते.आपण ज्या कृषिप्रधान देशात राहतो तेथेच या कृषकाची अशी अवस्था पाहताना! सत्तेवर सरकार येते, सत्ता स्थापन करते.शेतक-यांसाठी कोटींच्या कोटी घोषणा ही होतात आणि दुस-या बाजुला मात्र याच शेतक-याचा आपला माल रस्त्यावर फेकावा लागतो ही वस्तुस्थिती आहे.कधी कांदा रडवतो तर कधी झेंडुचा चिखल होतो .कापुस ,मका व सोयाबीनला हमीभाव मिळत नाही.मागील तीन चार वर्षे तर सतत चा दुष्काळ,यात सततच्या भारनियमाने तर उपलब्ध पाणी देखील शेतीला देता आले नाही.अशा सर्व समस्येचा सामना बळीराजाला करावा लागतो आणि यातुनही शेवटी जो माल पदरात पडतो त्याचा मोबदला शेतक-यापेक्षा व्यापा-यालाच जास्त फायदेशीर असतो.मेहनत एकाची अन् लाभ दुस-यालाच अशी गत झालीय. शेतक-याला पेऱणीपासुन ते पिक बाजारात नेईपर्यंत अनेक संकटांना सामोरे जावे लागते.कधी बोगस बियाणे तर कधी खरेदीला रांगाच रांगा.एक धान्य पिशवी बियाणे खरेदीला कधीे कधी एक दिवस जातो नेमके याच दिवसात शेतीची इतर कामे देखील महत्वाची असतात. तिच गत नुकसान भरपाई अनुदानाची.पिकांचे पंचनामे कोण करतात अऩ् कसे होतात हे माहितय आपणाला.पिकविमा भरताना खरा राबता शेतकरी शेतात असतो,गांवकारभारी शेतकरी मात्र पिकविमा भरतात,शासनाचे अनुदानही पदरात पाडुन घेतात.यातुन खरा शेतकरी मात्र या अनुदानास वंचित होतो काऱण काय तर बँकेत असणा-या रांगाच्या रांगा.म्हणुन सरकारने सरसकट सर्वांनाच अनुदानास पात्र समजावे. सततच्या नापिकीला कंटाळुन,सावकारी कर्जाला कंटाळुन महाराष्ट्रातील शेकडो शेतकरी मृत्युचा पाश आपल्या गळ्याभोवती आवळुन आपली स्वत:ची सुटका करुन घेतात.पण घरातील कर्ता पुरुष गेल्याने खुप हाल होतात त्या कुटुंबाचे.त्या घरातील मुले उच्च शिक्षणापासुन वंचित राहतात. सध्या वाढलेली शैक्षणिक फिस त्या कुटुंबाला परवडत नाही.मुलांना शिक्षण ,उत्तम आरोग्य,मुलीचे लग्न,या समस्यांचा सामना त्या कुटुंबियांना करावा लागतो.हे सर्व रोकायचे असेल तर गरज आहे ती सरकारच्या ठोस धोरणांची व अंमलबजावणीची.अशा कुटुंबातील मुलांचे शिक्षण सरकारने मोफत केले पाहिजे.व अशी वेळ कोणावरही येऊ नये म्हणुन योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. यंदा वेळोवेळी पावसाने साथ दिली.सुरुवातीला थोडाथोडा का होईना पण शेतीला आवश्यक असा पाऊस झाला.पिके जोमाने आली.मध्यंतरी जरा पानसाने ओढ दिली परंतु परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावुन नेला.सगळीकडे पाणीचपाणी झाले.शेते, विहीरी,नदी,नाले,ओढे,बंधारे,तलाव,धरणे सर्व तुडुंब भरली.संततधार पावसाने व जास्त पाण्याने पिके नासली.उडीद,मुग,सोयाबीन ही पिके हातची गेली तर तुरींची पाऩे पिवळी पडली अन् पुन्हा माझ्या बळिराजावर निसर्गाने अवकृपा केली.मागील तार वर्षापेक्षा यंदा तरी दसर, दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्याची स्वप्न पाहतानाच निसर्ग असा कोपला.पंधरा दिवसातच होत्याचे नव्हते करुन सोडले.पुढील भविष्यासाठी हा पाऊस चांगला झाला पण सध्याच्या वर्तमानाचे काय?परंतु पुन्हा बळिराजा रब्बीच्या तयारीला जोमाने लागलाय,दाद द्यावी त्याच्या हिमतीला. गतवर्षी झेंडुला ५०-६०रुपये भाव मिळाल्यामुळे अनेक शेतक-यांनी आपल्या शेतात झेंडुची लागवड केली.परंतु या वर्षी दस-याला सुरुवातीला १०-१५ रुपयांनी विकणारा झेंडु ३-५रुपयावर येऊन ठेपला.शेतक-याला त्याच्या लागवडीचा,मशागतीचा खर्च करी परवडला का?अनेक शेतक-यांनी तर ट्रकच्या ट्रक झेंडुची फुले रस्त्यावर फेकणेच पसंद केले.या शेतीच्या कामात कुटुंबातील महिला, शालेय विद्यार्थी शेतात राबत असतात.त्यांना तरी मदत म्हणुन आपण एवढेच करुयात.......... व्यापा-यांकडुन भाजीपाला खरेदी न करता शेतक-यांकडुनच खरेदी करुयात. भाजीपाला खरेदी करताना भावात घासघीस करु नका.त्या शेतक-याचीही मुले शिकुन आपल्यासारखीच नौकरदार बनण्यासाठी मदत करुयात.आपल्या आजी-आजोबांनी,आई-वडिलांनी आपणाला शेतात कष्ट करुनच दोन पैसे मिळविल्यामुळेच आपण शिकलो याची जाणीव ठेवा!शेतक-यांला जगवायचे असेल तर आपण एवढे करायलाच पाहिजे.तरच आपण या शेतीप्रधान देशातील शेतक-याची भावी पिढी म्हणुन गर्वाने मिरवु! संगीता भांडवले मुख्याध्यापिका जि प प्रा शाळा शेंडी ता वाशी,जि उस्मानाबाद 9923445306 Email-iamsangitabhandwale@gmail.com Blog-myshikshankatta.blogs.com

3 comments:

  1. खुप छान

    शेतकरी विषयी आपले मत वाचून आनंद वाटला

    ReplyDelete
  2. खुप छान

    शेतकरी विषयी आपले मत वाचून आनंद वाटला

    ReplyDelete